
“आऊसाहेब” ; कवयित्री अपूर्वा बेहेरे
आऊसाहेब म्हणजे वादळ
विलक्षण प्रतिभावान
या मराठी मुलखाची
आन, बाण, आणि शान
‘चूल अन् मूल’ च्या
जावूनी उंबऱ्यापार
चालवलीस माते
दिमाखात तलवार
यवनांनी देशबाधवांची
गुलामगिरीत केलेली होरपळ
पाहूनी लोचनी तुझ्या दाटली
स्वातंत्र्यासाठीची तळमळ
आई भवानी चरणी
साकडे असे घातले
स्वराज्य साकार करणाऱ्या
पुत्राचे मागणे मागितले
घोडेस्वारी अन् लढायांचे
तुज मग लागले डोहाळे
कुतूहल वाटावे असेच
तुझे मातृत्व जगावेगळे
शिवनेरी गडावर अशी उजाडली
एक सोनसकाळ
योगियाचा प्राण ज्याचा
असे जन्मले शिवबाळ
बालपणीच त्यांना दिले
राजनीतिचे शिक्षण
रामायण महाभारतातील गिरवून घेतले
पराक्रमाचे क्षण
स्री-दाक्षिण्याचे संस्कार
शिवबांत रूजविले
मुळातच तो हिरा,
तयास पैलू पडत गेले
कित्येक होऊन गेले
निव्वळ सत्ताधारी
तुम्ही निर्माण केलात मात्र
रयतेचा कैवारी
जिजाऊ तुम्ही आहात
अमर राजमाता
हा सूर्य उगवत राहिल तोवरी
तुमची गायली जाईल गाथा
– *अपूर्वा बेहेरे*
(धुळे जि धुळे)
( © *सदस्या मराठीचे शिलेदार समूह*)