
१५ तारखेच्या संक्रांतीची महत्वं आगळे वेगळे
अमृता खाकुर्डीकर, प्रतिनिधी
पुणे :सूर्याचा मकर राशीत प्रवेश होतो आणि त्याच्या उत्तरायणाचा प्रारंभ होतो. तो पहिला दिवस ‘मकर सक्रांत’ सण म्हणून आपण साजरा करतो. दरवर्षी १४ जानेवारीला येणारा हा सण यावेळी १५ जानेवारीला आला आहे. याची खगोल शास्त्रीय कारणे आहेत; तशीच त्याचे धार्मिक महत्त्वही आहे.
शेकडो वर्षापूर्वी उत्तरायण सुरू होताना तो पहिला दिवस वर्षातील सर्वात लहान दिवस असे. त्याचे हे वैशिष्ट्य म्हणून तो दिवस आनंदाने खास साजरा करण्याची प्रथा पडली. तोच हा सक्रांतसण. पण सध्या कॅलेंडर वर्षानुसार २२ डिसेंबर हा सर्वात लहान दिवस असतो. तरीही सूर्याचा मकर राशीत प्रवेश लक्षात घेऊन ‘मकर संक्रांत’ दरवर्षी १४ किंवा १५ जानेवारीला साजरी होते.
खरे तर डिसेंबर – जानेवारी महिन्यातच सूर्य दक्षिण आकाशात झुकलेला दिसतो. सूर्य दक्षिण पूर्वेला महत्तम बिंदूवर असताना दक्षिणायन संपून सूर्याचा उत्तरेकडे प्रवास सुरू होतो. त्यालाच आपण उत्तरायण प्रारंभ म्हणतो. आपण भारतीय ज्या उत्तर गोलार्धात राहतो, हा गोलार्ध हळू हळू सूर्याच्या समोर येण्यास सुरूवात होते. त्यामुळे दिनमान वाढू लागते. खगोलीय स्थितीनुसार धनु राशीतून सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. या संक्रमणामुळे हा दिवस “मकर संक्रांत” म्हणून संबोधला जातो. या सणाचे वैशिष्ट्य सांगायचे तर आपले इतर बहुतेक सण ‘चंद्रा’ शी निगडित असल्याने इंग्रजी कॅलेंडरमधील ठराविक अशा तारखेस येत नाहीत तर, आपण ते पंचांगातील तिथीनुसार साजरे करतो. परंतु मकर संक्रांत हा सण मात्र सूर्याशी निगडित आहे, तसेच इंग्रजी कॅलेंडर हे देखिल सूर्य भ्रमणावर म्हणजेच सौर कालगणनेवर आधारित आहे. म्हणून संक्रांत नियमितपणे १४ जानेवारीलाच येते आणि कधी कधी ती १५ जानेवारीलाही येते, जशी यंदा आली आहे. हा १४ /१५ असा एक दिवसाचा फरक इंग्रजी कॅलेंडर मधील लीप वर्षामुळे पडतो. जसे की, २८ दिवसांचा फेब्रुवारी महिना लिप वर्षात २९ दिवसाचा असतो. सूर्य एका राशीत मार्गक्रमण करून पुन्हा त्याच राशीत येणे या कालावधीला ‘नक्षत्रवर्ष’ म्हणतात. त्याचप्रमाणे ऋतुनुसारही वर्षाची कालगणना केली जाते. या दोन्ही कालगणनेत काही अंतर पडते. म्हणून सूर्याचा मकर राशीत प्रवेश १४ ऐवजी १५ ला होतो.
सौर काल गणनेशी संबंधित संक्रांत सण वैज्ञानिक तत्त्वावर आधारीत आहे. चंद्र तसेच पृथ्वीची गती आणि त्यावरून सूर्याचे बदलणारे स्थान यानुसार ऋतुमान बदलते. निसर्गतील या बदलाचा आपल्या पूर्वजांनी सूक्ष्म अभ्यास केलेला होता. म्हणूनच अगदी विचारपूर्वक या सणाचा संबंध धार्मिकतेशी जोडला गेला आहे, अशी माहिती खगोल शास्त्र अभ्यासक श्री. अनंत जोशी यांनी ‘तरूण भारत’ शी बोलताना दिली.
एकूणच काय तर या काळात छान थंडी असते. यावेळी तर हवामानाच्या अंदाजानुसार हे दोन तीन दिवस अधिक थंडीचे असणार आहेत. थंडीमध्ये आपल्या शरीराचा उष्मांक वाढणे गरजेचे असते. म्हणून तीळ, गुळ, बाजरीची भाकरी यासारखे पदार्थ, या ऋतुत उगवणा-या सर्व छान छान भाज्या आहारात अंतर्भूत केल्या जाव्यात, हा खरा उद्देश आहे. अर्थात, निसर्गक्रमानुसार आपला आहार- विहार क्रम असायला हवा, त्याप्रमाणे
आहारात योग्य त्या वस्तूंचा समावेश करून आरोग्याची काळजी घेणे व ते सुदृढ राखणे हे दोन्ही हेतू यातून सफल होतात.
कोणतेही सण नुसतेच समारंभाच्या वरवरच्या थाटात हरवून न जाता ते माणसाच्या दैनंदिन जगण्यास हितकारक ठरावेत हा त्यापाठीमागचा उदात्त हेतू आहे.
“तिळगूळ घ्या गोडबोला “असे म्हणून एकमेकांना तिळगूळ देताना मनातले सगळे रागलोभ विसरून परस्पर संबंध मधुर करण्याचा उत्तम मार्ग यानिमित्त अगदी युक्तीने व चतुराईने आपल्या परंपरेत रूढ झाला आहे. कारण यातून मानसिक आरोग्य आणि सामाजिक वर्तन या दोन्ही गोष्टी साध्य करण्याचा प्रयत्न आहे. शिवाय दान धर्म करण्याच्या पध्दतीमागे सुध्दा एक सामाजिक जाणीव आहे.
स्त्रियांसाठी हा सण खूप आनंदाचा असतो. एकमेकींना वाण आणि भेटवस्तू देताना मैत्र अधिक दृढ होते. सामाजिक संपर्क व संवादाची ही सुंदर परंपरा स्त्रिया या सणानिमित्त मनापासून जपतात.