
मुलांच्या सशक्त व्यक्तिमत्त्वासाठी हवीत ‘आनंदाची फुले’; माधवी वैद्य
_पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न_
अमृता खाकुर्डीकर, प्रतिनिधी
पुणे: मुलाच्या सशक्त व्यक्तिमत्त्वासाठी ‘आनंदाची फुले’ सारखी प्रेरणा देणारी पुस्तके हवीत. संवेदना बोथट होत चाललेल्या आजच्या काळात सत्प्रवृत्ती जाग्या करणा-या संवेदना मुलांमध्ये रुजवण्याचे काम करण्यास अशा कथांच्या मदत होईल .” असे विचार प्रसिध्द लेखिका माधवी वैद्य यांनी कवयित्री संजीवनी बोकील लिखित ‘आनंदाची फुले’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात बोलताना व्यक्त केले.
या कार्यक्रमात पुढे बोलताना माधवी वैद्य म्हणाल्या,” आजकालचे पालक मुलांना सा-या सुखसुविधा देत आहेत, पण मुलांना हवा असतो आई-वडिलांचा सहवास आणि वेळ. तो द्यायला हवा. मुलांना त्याची सर्वात जास्त गरज आहे. ”
राजहंस प्रकाशनाच्या वतीने प्रकाशित ‘आनंदाची फुले’ या बाल कथासंग्रहाचा प्रकाशन सोहळा आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. ते म्हणजे, या सोहळ्याचे आयोजन पुण्यातील पाच शाळांमधील शालेय विद्यार्थ्यांनी मिळून केले होते.
सुप्रसिद्ध साहित्यिका संगीता बर्वे यांच्या शुभहस्ते पुस्तक प्रकाशन करण्यात आले. पुस्तकाचा गौरव करताना संगिता बर्वे म्हणाल्या, ” ओघवती भाषा, चित्रमय शैली व वास्तव संवाद यांमुळे या पुस्तकातील कथा लहान मुलांना नक्कीच प्रिय होतील.”
पुस्तकाच्या लेखिका प्रसिध्द कवयित्री संजीवनी बोकील यांनी याप्रसंगी आपले भावपूर्ण मनोगत व्यक्त केले. त्या म्हणाल्या ” संवेदनाक्षम साहित्य हे हृदयांमध्ये पूल बांधण्याचे काम करते. लहान मुलांमध्ये संवेदना रुजवण्यासाठीच या कथा मी लिहिल्या आणि पुस्तकरूपाने बालवाचकांच्या हाती सोपवल्या आहेत.मुलांनी ही ‘आनंदाची फुले’ वेचायला हवीत.”
प्रारंभी तनय नाझिरकर या विद्यार्थ्याने प्रार्थना गायन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजहंस प्रकाशनाचे संपादक डॉ. सदानंद बोरसे यांनी केले.
राघव भिडे या विद्यार्थ्याने पाहुण्यांचा परिचय करून दिला. सानिका व राधा जोशी यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात ज्ञानप्रबोधिनी व गोळवलकर प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी ‘आनंदाची फुले’ या पुस्तकातल्या दोन कथांचे अभिवाचन सादर केले.
कार्यक्रमास निवेदक आनंद देशमुख, तसेच अनेक शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व पालक आणि सदानंद महाजन, निलेश सुळे, मधुमिता बर्वे नगरसेवक बंडू केमसे इ. मान्यवर आवर्जुन उपस्थित होते. ‘आनंदाची फुले’ हे संजीवनी बोकील यांचे पंचविसावे पुस्तक प्रकाशित झाले असून साहित्य क्षेत्रातील मान्यवरांनी याबद्दल संजीवनीताईंवर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.