
‘स्नेहगुणांचा सण… मकरसंक्रांत’; अर्चना सरोदे
मकर संक्रांतीला महाराष्ट्रात नुसतेच संक्रांत म्हणतात. या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करत असल्याने हा दिवस दरवर्षी मकरसंक्रांत म्हणून साजरा केला जातो. सूर्याच्या मकर राशीत प्रवेशाचा तो पहिला दिवस आहे. हिंदू दिनदर्शिके मध्ये सूर्य उत्तरेकडे सरकतो. या दिवसाला उत्तरायण असेही म्हटले जाते. संक्रांतीला तिळाचे फार महत्त्व आहे. हा काळ थंडीचा असल्याने आहारात स्निग्ध व उष्ण पदार्थांचे सेवन केले जाते. संक्रांतीचा आदला दिवस महाराष्ट्रात भोगी या नावाने साजरा होतो. सर्व शेंंगाभाज्या, फळभाज्या यांंची तिळाचा कूट घालून केलेली मिश्र भाजी, तीळ लावलेली बाजरीची भाकरी, लोणी अणि डाळीची खिचडी असे पदार्थ या दिवशी आवर्जून केले जातात. संंक्रांंतीच्या दिवशी गुळाची पोळी आणि तिळगुळाचे विशेष महत्त्व असते. स्नेह-मैत्री म्हणजेच तिळ व गुळाचे मिश्रण करुन त्याचे लाडू बनवले जातात. आपापसातील कटुता मिटून स्नेहाची गोडी वाढावी हा त्यातला हेतू. तेव्हा या दिवशी या तिळगुळाची देवाण घेवाण करायची, स्नेह वाढवायचा, नवीन स्नेहसंबंध जोडायचे. जुने असलेले समृद्ध करायचे, तुटलेले आवर्जून पूर्ववत करायचे हा त्याचा उद्देश असतो.
लहान बालकांंनाही संंक्रांंतीनिमित्त काळ्या रंंगाचे कपडे घालणे व त्यांना हलव्याचे दागिने घालणे अश्या पद्धती दिसून येतात. चुरमुरे, बोरे, हरभरे, उसाचे तुकडे, हलवा असे मिश्रण लहान मुलांंच्या डोक्यावर ओततात. अलीकडे यामधे गोळ्या, छोटी बिस्किटे घालण्याची हौसही दिसते. तसेच या मिश्रणामध्ये लहान मुलांची आवडती चाॅकलेटेही घालतात. याला बोरन्हाण अथवा लूट असे म्हणतात. बालकांच्या वयाच्या पाचव्या वर्षापर्यंत बोरन्हाण केले जाते.
संक्रांत ते रथसप्तमी पर्यंत घरघरात हळदीकुंकू समारंभ केला जातो. सवाष्णींना हळदीकुंकू व वाण दिले जाते. नवविवाहित वधूचे हळदीकुंंकू विवाहानंंतरच्या प्रथम संंक्रांंतीला करण्याची प्रथा आहे. या दिवशी दारात रांगोळी काढली जाते.घरात सजावट केली जाते. नववधुला काळी साडी भेट दिली जाते. हलव्याचे दागिने तीला घातले जातात. जावयालाही कपडे व हलव्याचे दागिने देऊन त्यांंचे कौतुक केले जाते. तर असा हा तिळ आणि गुळाच्या स्नेहगुणांचा सण म्हणजे संक्रांत.
अर्चना सरोदे
सिलवास,दादरा नगर हवेली आणि दमण व दिव