
‘….म्हणजे देव ‘यांच्या’वरही जादू करतो’; राहुल पाटील
आज ना आनंदाचा दिवस. सर्वांसाठी असो की नसो, परंतु प्रेमाचे नवनवे रंग उधळणा-या आणि प्रेमस्वप्ने पाहणा-या अबालवृद्ध ते आजच्या तरूणाईपर्यंत प्रेमात पडलेल्या प्रेमवीरांसाठीचा आजचा ‘खास’ दिवस. कधीतरी आपल्या मनातील रिता कोपरा, कुणालातरी देता येईल का? या विचारात वर्षभर येरझरा मारलेल्या प्रियकर प्रेयसींनी व्यक्त होण्यासाठी विशेष सवलतीचा दिवसही म्हणता येईल. खरे पाहता आज प्रत्येकाचे जीवन हे धकाधकीचे आहे. त्यात प्रेम करायला किंवा दोन शब्द प्रेमाचे बोलण्यासाठी उसंत नसते. प्रेमात पडलेल्यांच्या याच ना अशा अनेक लहान सहान बाबीवरून भांडण, तंटे हे नेहमीचे होऊन जाते. मग अशातच, दुरावा, विरह यासह नकारात्मक विचारांना नव्या वाटा फुटतात. अर्थात संशयी वृत्तीचा उगम पावतो, एकमेकांच्या मनात चलबिचल आणि बरेच काही.
परंतु प्रेमाच्या पवित्र नात्यात बांधलेल्या प्रेमवीरांना असाच आजचा दिवस पुनश्च विश्वासाने एकत्र आणतो आणि प्रेमात विरहात आजवर सहन केलेल्या वेदना या काही क्षण तरी आनंदात एकवटून जातात. आणि सहजच मन बोलके होते. ‘देवाच्या कृपेने माझे प्रेम पुन्हा परत आले’. मला माझ्या आयुष्याचा जोडीदार भेटलाय..हे जरी एकमेकांच्या विश्वासावर अवलंबून असले तरी, या प्रेमवीरांवर देव जादू करतो असेच काहीसे चित्र सर्वत्र दिसते. कोरोना कालावधीत असेच एका वृद्धाश्रमात भेट दिली. तेव्हा ‘रिटायर्ड मेजर’ यांच्याशी भेट झाली. त्यांच्या कौटुंबिक इतिहासात न डोकावता, ते दु:खी असल्याचे जाणवले. अंगावर एक मखमली शाल ओढून ते सतत राहायचे ऐवढी माहिती प्रत्येकांनी दिली. खरे तर ती शाल त्यांच्या प्रिय पत्नीची होती. त्यांचा सर्वांना भीतीयुक्त आदर होता. पण वृद्धाश्रमातील एका ७२ वर्षीय आजीशी बोलतांना असे जाणवले की, समदु:खी असलेल्या जानकी देवी यांच्या मनातील एक कोपरा मेजर यांना खुणावतोय. ती माझी दृष्टी आणि दृष्टीकोन. पण आज गेल्या महिन्यात एका कार्यक्रमानिमित्त पुन्हा त्याच आश्रमात जाणे झाले. आणि आश्चर्याचा धक्का बसला. जानकीदेवी आता ‘त्या’ मखमली मऊशार शाल ओढून आनंदीपणे वावरत होत्या. सहजच विचारणा केली, ही शाल तर….? त्यावर त्या म्हणाल्या, ‘विश्वासाचं नातं जपतांना देवही मदतीला येतो, तो खरच जादू करतो”…. म्हणजे खरच देव ‘यांच्या’वरही जादू करतो,’ आणि प्रेम करणारे हे खरे जादूगार ठरतात. सहजच एक वाचनात आलेली प्रेमकविता… विचार करायला नक्कीच भाग पाडेल.
प्रेम का करू नये……….?
असं कुणी ‘पैज’ लावून म्हणत असेल
तर तुम्ही नक्की करा प्रेम
जर समोरच्याच मन जपता आल,
तर नक्की करा प्रेम
जर सगळ्यांना आनंद देता आल,
तर तुम्ही नक्की करा प्रेम
एकाचे ‘हसू’ दुस-याचे अश्रू होणार नसतील,
तर नक्की करा प्रेम
आयुषभर सांभाळता आलं
तर तुम्ही नक्की करा प्रेम
कोणालाही न फसवता करता आलं तर
तुम्ही नक्की करा प्रेम
स्वप्नांना खर करता आलं
तर तुम्ही नक्की करा प्रेम
राहुल पाटील,नागपूर
मुख्य संपादक ‘साप्ताहिक साहित्यगंध’
====