“होऊ या जरा सैल…तन-मन जपताना”; वैशाली उत्तम अंड्रस्कर

“होऊ या जरा सैल…तन-मन जपताना”; वैशाली उत्तम अंड्रस्कर,पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

महिला सबलीकरण.. महिला सक्षमीकरण..क्षितीजापार झेप नवयुगातील नारीची…किती बरं वाटतं ना ऐकायला…!

खरंच मुळूमुळू रडणे, चूलमूल सांभाळणे आणि एका संस्कृत सुभाषिताप्रमाणे…कार्येषु दासी करणेषु मंत्री रूपे च लक्ष्मी क्षमया धरित्री | भोज्येषु माता शयनेषु रंभा षट्कर्म युक्ता कुलधर्म पत्नी ||

अर्थात – पत्नी एका दासीप्रमाणे सेवा करणारी, एखाद्या मंत्र्याप्रमाणे सल्ला देणारी, लक्ष्मीच्या रूपात असणारी, धरित्रीप्रमाणे क्षमाशील, जेवण वाढताना मातेसमान आणि शयनगृहात रंभा अप्सरेप्रमाणे सुख देणारी अशा सहा गुणांनी युक्त स्त्रीला कुलाचारिणी पत्नी म्हणून संबोधले जायचे. पण खरंच का स्त्री ची फक्त एवढीच रूपे आहेत ?

आज या तंत्रज्ञानाच्या युगातही भलेही स्त्रीच्या मदतीला अनेक यंत्रसामुग्री असेल; पण घर सांभाळणे ही तिचीच जबाबदारी मानली जाते. काही सन्माननीय अपवाद असतीलही नाही असे नाही, पण तेही तुरळकच. ती शिकली घराबाहेर पडली, उंबरठ्याबाहेरचे विश्व तिला खुणावू लागले. आकाशाला गवसणी घालण्याचे स्वप्न तिच्या डोळ्यांत तरळू लागले. पण स्त्रीत्वाच्या जबाबदाऱ्या काही नैसर्गिक तर काही परंपरेने आलेल्या त्या मात्र कायम तिच्या पाठिशी राहिल्या.

होय, यापूर्वीही स्त्री राबायची घरात, शेतात पण त्याला वेळेची एक मर्यादा होती. पहाटेपासून जरी उठून दळणकांडण करणे, विहिरीचे पाणी शेंदणे, सडासारवण, चुलीच्या धुराने आलेल्या डोळ्यांतील पाण्यात वेदनेचे अश्रू लपवत राहायची आणि यासाठीच कदाचित काही परंपरा, सण, व्रतवैकल्ये तिच्या दैनंदिन आयुष्यात आली. त्यानिमित्ताने जरा निवांतपणा, सखी मैत्रिणींच्या भेटीगाठी, हितगूज, एकमेकींच्या खोड्या या अगदी सहज होऊन जायच्या आणि याला परंपरेच्या नावाखाली ज्येष्ठांची हरकतही नव्हती. एक गोड स्वप्न घेऊन ती निद्राधीन व्हायची परत नव्याने उद्याच्या कर्तव्याला सामोरी जाण्यासाठी.

आज काळ बदलतो आहे. जगाचा वेग वाढतो आहे आणि त्याबरोबरच जगण्याचा वेग. दिवस आणि रात्रीचा फरकच उरलेला नाही. स्त्री असो वा पुरूष, शहरातील असो वा गावखेड्यातील जगण्याची शर्यत इतकी आटापिट्याची झाली आहे की, आपण जगण्यासाठी कमवतो की कमावण्यासाठी जगतो हेच कळेनासे झाले. या शर्यतीत तन आणि मन या दोन्हींकडे दुर्लक्ष होतेयं हे मात्र खरंय.

जाणीव आहे एक वय असतं सारं काही नवलाईने करायचं. त्यावेळेस तन तंदुरुस्त असतं मन हवेत तरंगत असतं. बाळगोपाळांच्या संगतीने, हास्याने कौतुकाने मनावरचा भार हलका होत असतो. कर्तव्येही आनंदाने पार पाडली जातात. पण हळूहळू शरीराचा वेग मंदावतो. मुले मोठी होत जातात तसतश्या जबाबदाऱ्याही वाढत जातात. मुलामुलींचे शिक्षण, त्यांचे नोकरी व्यवसायात जम बसवण्याची धडपड, घरात ज्येष्ठ मंडळी असल्यास त्यांचे दुखणेखुपणे यात स्वतःच्या शरीराकडे दुर्लक्ष होतं. वागण्यात चिडचिडेपणा, आयुष्य निरर्थक असल्याची भावना, स्त्रीत्वाची, मातृत्वाची खूण असलेली मासिक पाळी आता रजोनिवृत्तीकडे आलेली असते. अशा या प्रौढपणाच्या पायरीवर काहीतरी हरवल्याचा भास होतो. हातातून वाळू निसटल्यागत आयुष्य निसटत चालल्याची खंत मनात दाटून येते. ‘अरे…! माझे जगायचे तर राहूनच गेले’. याची हूरहूर मनात काहूर माजवते. हे सर्व घडू नये म्हणून खरंच आजच्या काळातील सखींनी जरा स्वतः मध्ये बदल करावा. घरातील सर्वांनीच तो बदल स्वीकारण्याचा प्रयत्न करावा.

नुकतेच माझ्या शाळेतील लॉरेटा पवार मकासरे या सहकारी शिक्षिकेने एक स्त्रीसूक्त माझ्या व्हॉट्स एप वर पाठवले.

‘तूच कर बाई आता तुझी तूच कदर,
तूच तुझा कर ना तुझा तूच आदर..

राहिले दिवस जग आता कर मन मोकळं
गप्पाटप्पा..फिर भिरभिर..हास मनमोकळं

नको करू विचार आता हो मनमुक्त
सुखाच्या आयुष्याचं नवं स्त्रीसूक्त !’

कुणी लिहिले ठाऊक नाही. पण स्त्री सूक्तातील वरील काही ओळी मनाला एक नवीन ओळख देऊन गेल्या. तुझी कदर तूच कर वाचताना कळले की, अरे हो आपणच आपल्याला कसे काय विसरतो ? आपलं शरीर, आपलं मन यांच्या गरजा आपल्यापेक्षा कोण जास्त ओळखू शकतं. होय मान्य आहे. रितीरिवाज, परंपरा पाळायच्याच. पण कोणी म्हणतं म्हणून नाही आपल्या आनंदासाठी, उपवास करायचे ना पण शरीराची हाक ऐकून… कुठल्या अज्ञात शक्तीला देवाला घाबरून नाही. तुम्ही आस्तिक असाल तर लक्षात ठेवा देव कुणाचेच वाईट चिंतणार नाही. जो घडवतो तो बिघडवेल कसे ना…? नास्तिक असाल तर स्वतःच्या मनगटावर विश्वास ठेवून मार्गक्रमण करा, पण शरीराची हाक ऐकाच. आयुष्य फार खडतर होतंय. शरीराबरोबरच मनाचाही थकवा आपल्याला हरवतो. मनःस्वास्थ्य बिघडवतो. म्हणूनच महिला दिनाच्या निमित्ताने सांगावसं वाटतं… खूप भरारी घ्या… अगदी अटकेपार झेंडे रोवा…पण जरा सैल होऊन जपू या तना-मनाला तरच खरा महिलादिन साजरा होईल.

सर्व मैत्रिणींना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…!

सौ.वैशाली उत्तम अंड्रस्कर, चंद्रपूर
कवयित्री/लेखिका
मुख्य सहसंपादक/ सहप्रशासक/मुख्य परीक्षक/संकलक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles