
बैलपोळा
आठवतो आजही मला
लहानपणीचा बैलपोळा..
सखा सोबती समवेत
व्हायचो आम्ही एकत्र गोळा..
सकाळीच व्हायची धावपळ
बैलांच्या शाही स्नानाची..
आमची मात्र तारांबळ
व्हायची बैल रंगवायची..
मारूतीच्या पाराजवळ तो
फुटायचा बैलपोळा सर्वांचा..
पारावार उरायचा नाही
संवगड्यांसोबत आनंदाचा..
आईची असायची एकच घाई
धवळ्या-पोवळ्याला पूजायची..
आशिर्वाद देऊन बळीराजाला
धन-धान्य सुख-समृद्धी देण्याची..
बैलपोळा करी सण गोळा
म्हण असे ही पूर्वजांची..
शेतकरी बांधव प्रेमाने
पूजा करी सर्जा-राजाची..
बळीराजाच्या या दैवताचे
उपकार आहेत थोर भारी..
काबाडकष्ट करूनी मिळते
सुख-समृद्धी,धन-धान्य घरी..
श्रीमती सिमादेवी बेडसे चाळीसगाव