
कामगारांच्या न्यायासाठी भारतीय मजदूर संघाचे सर्वव्यापी आंदोलन
अमृता खाकुर्डीकर, पुणे
पुणे: अखिल देशपातळीवरचे भारतीय मजदूर संघ या कामगार संघटनेचे राष्ट्रीय अधिवेशनात बिहारमध्ये पाटणा शहरात नुकतेच भरवण्यात आले होते. सदर अधिवेशनात झालेल्या ठरावातील घोषणेनुसार उद्योग क्षेत्रातील संघटीत, असंघटीत कामगारांच्या न्याय्य मागण्यांसाठी काही महत्त्वपूर्ण प्रस्ताव मंजूर करण्यात आले. या प्रस्तावातील ठरावानुसार भारतीय मजदूर संघाने देशभर सर्वव्यापी आंदोलन छेडले असून सर्व जिल्ह्यांच्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालया
समोर आंदोलन कार्यक्रम आयोजित केले आहेत. याबाबतच्या ठरावाच्या प्रती मा. पंतप्रधानांना रीतसर पाठविण्यात येणार आहेत.
*ठरावातील मागण्या याप्रमाणे आहेतः*
1) सर्व कामगारांकरिता सामाजिक सुरक्षा.
2) कंत्राटी कामगार पध्दतीत सरकार व प्रशासन यांचे स्तरावर सुधारणा व कंत्राटी कामगार कायद्याचे कामगार हितासाठी पुर्नरचना .
3) आर्थिक विकासासाठी श्रम नितीधोरण..
4) ‘किमान वेतन’ या ऐवजी ‘लिव्हींग वेज’ .
असे प्रमुख चार ठराव राष्ट्रीय अधिवेशनात संमत करण्यात आले असून ते मुख्यतः समोर ठेवून या आंदोलनाच्या माध्यमातून न्यायाची लढाई पुन्हा एकदा सुरू करण्यात आली आहे.
मजदूर संघाचे अखिल भारतीय संघटन मंत्री श्री. बी. सुरेंद्रन यांनी सर्व जिल्ह्यात आंदोलने, धरणे आंदोलन ई. लोकशाही मार्गाने कामगारांमध्ये जनजागृती करावी असे आवाहन केले आहे. या आवाहनास प्रतिसाद म्हणून जनजागृती करणारे निवेदन सर्वांपर्यंत पोहचवणार आहे, असे संघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री अनिल ढुमणे यांनी सांगितले.
भारतीय मजदूर संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष, हिरण्यमय पंड्या व महामंत्री रविंद्र हिंमते यांनी देशातील विविध ऊद्योग क्षेत्रात संघटना बांधणी करणा-या राज्यातील मजदूर संघाच्या पदाधिकारी व कामगार यांना प्रोत्साहन दिले असून या आंदोलनात महाराष्ट्रातील कंत्राटी कामगारांनी एकजुटीने सहभागी व्हावे असे आवाहन महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघांचे अध्यक्ष श्री. निलेश खरात व सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी केले आहे.