
ट्रॉय मराठी शाळा आणि डेट्रोइट महाराष्ट्र मंडळ
वसुधा नाईक थेट अमेरिकेहून
यूएसए: येथील शाळेत सध्या 1200 च्या पुढे भारतीय मुले शिक्षण घेत आहेत. मुलांना उत्तम मराठी शिक्षण दिले जाते.तेही फुकट. एकही पैसा पालकांकडून घेतला जात नाही. यांची तळमळ एकच असते की या परदेशात राहूनही आपली संस्कृती मुलांनी विसरू नये. आज मुलांचा स्नेह संमेलनाचा दिवस होता.
माझी पुतणी अमृता तिचा मुलगा, माझा नातू विहान या कार्यक्रमात सहभागी होता. मला उत्सकुता होती की कसे असेल हे स्नेह संमेलन कार्यक्रम बरोबर वेळेवर सुरु झाला.. याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे 11 वर्षाच्या मुलांनी निवेदन केले. प्रत्येकाला चान्स दिला गेला.
सुरुवात गणेश पूजनाने झाली. गणपतीची आरास केली होती. ती आरास करताना ज्या वस्तूंचा वापर ज्या मुलांनी केला त्या मुलांनी त्याचे विविध उपयोग सांगितले. लहान मुलांचे ‘अगोबाई ढगोबाई’या गाण्यावर सुरेख नृत्य झाले.
‘असावा सुंदर चॉकलेटचा बंगला,’ बाहुली माझी छान ग ‘ही गाणी छोटी मुले म्हणताना खूप गोड वाटत होते.या गाण्यात माझा नातू ‘विहान ‘ याने सहभाग घेतला होता. शोधिसी मानवा हे भक्ती गीत 10 वर्षाच्या मुलांनी खूप छान म्हटले. अंदाजे 12 वर्षाच्या मुलांनी भाषणे केली विषय होते… कवी, लेखक..1) नारायण सुर्वे 2)पु. ल. देशपांडे 3)कुसुमाग्रज 4)शांता शेळके यांच्या बद्दल छान माहिती दिली मुलांनी.
दिलीप प्रभावळकर लिखीत लहान मुलांचे एक नाटक झाले. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली. सर्व इंडियन होते. मराठी बोलत होते… मजा आली. अनुभव घेतला..घरातील सर्वांबरोबर आनंद घेता आला.