
निष्ठेला पैशाने तोलले, ठिगळ तरी कसं लावणार?; सविता पाटील ठाकरे
_बुधवारीय काव्यरत्न स्पर्धेचे परीक्षण_
तसं त्याचं अस्तित्व कुणासाठीच महत्त्वाचं नव्हतं.! कोण बरं त्याची दखल घेईल ? वेडा म्हणून लोकांनी त्याला नेहमीच दुर्लक्षित केलेले. माझ्यासाठीही तो तसा दुर्लक्षितच होता. पण, संवेदनेच्या भावनेने मी त्याला नेहमी जाता येतांना पाहत होते. माझ्या शाळेच्या रस्त्यावरच्या एका पडीक घराचा पडका ओटा हे त्याचे घर. एक बोचकं सोबतीला , वाढलेली दाढी, फाटके कपडे हा नेहमीचाच अवतार. राजू त्याचं नाव. पण लोकांसाठी तो राजू वेडा.
आठ दिवसांपासून तो दिसत नव्हता. माहित नाही पण मनाला एक हुरहुर लागली. का नसेल दिसत? कुठे गेला असेल? काय झालं असेल? पण विचारू तरी कोणाला ?
एके दिवशी मी परिचित व्यक्तीला म्हटलं,राजू हल्ली दिसतच नाही. अगदी गंभीर चेहरा करून ती व्यक्ती म्हटली अहो, ‘तुम्हाला सांगायचं विसरलो मी’,तीन चार दिवसापूर्वी डोंगरा जवळ त्याचे मृत शरीर मिळाले, त्याचा खून झाला. पाणावलेल्या डोळ्यांनी मी म्हटलं, अरे त्याची का कुणाशी दुश्मनी असेल ? बिचारा!..यावर ते बोलले त्याचं अपहरण झालेलं, कुणीतरी त्याला पळवलं ,पैशांसाठी त्याच्या दोन्ही किडन्या काढल्यात आणि त्याला इकडे आणून मारून टाकले. बापरे!! क्षणभर माझ्या डोळ्यासमोर त्याचा निरागस पण हसरा चेहरा तरळला. ते पुढे म्हणाले, तुम्हाला जगाचे जास्त काही कळत नाही ही ‘दुनिया पैशांची’ आहे. इथे काहीही घडू शकते. पाणावलेल्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्यात. पैशांसाठी मानव एवढा नीच कृत्य कसे करू शकतो. माझा विश्वासच बसत नव्हता.
पैसा…पैसा..पैसा…!! सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत, जन्मापासून मृत्यूपर्यंत, आकाशापासून पाताळापर्यंत सर्वत्र बोलबाला असलेलं हे एकमेव साधन. हो पण खरंच याला एवढं महत्त्व देण्याची गरज आहे का?? पैसा एक बिछाना देऊ शकतो,झोप नाही. पैसा अन्न देऊ शकतो,भूक नाही. पैसा चांगले कपडे देऊ शकतो,सौंदर्य नाही. पैसा दिलासा देण्याचे साधन देऊ शकतो,पण आराम नाही. हल्ली तर या पैशांना एवढं महत्त्व दिलं गेलं ,की माणुसकी पैशांच्या पुढे खूप लहान झाली. पैशांसाठीच सख्ख्या भावाने, सख्ख्या भावाचा खून करताना मी ऐकले. पैशासाठी जन्मदात्या आईला वृद्धाश्रमात ठेवणारी जमातही मी पाहिली. पैशांसाठी दोन-तीन मुलांची आई लेकरांना सोडून दुसऱ्या सोबत निघून गेलेली मी वाचले. पैशांसाठी नात्यांच्या बाजारात माणुसकी विकतांना मी अनुभवले. पैशांसाठी नेत्यांचा प्रामाणिकपणा विकला जातो हेही वाचले. पैशासाठी इमान विकून निष्ठेचा खेळ खंडोबा होतो. पैशांच्या मोहापायी कोण कसं बरं ऐकणार…!! दुनियाच बदलली तिथं नातं काय टिकणार.. ? प्रामाणिकपणाचा बाजार मांडलाय आभाळ कसं सांधणार…? निष्ठेला पैशाने तोलले, ठिगळ तरी कसं लावणार???
दैनंदिन जीवनात आज पैशांचं महत्त्व खूपच वाढलेले आहे. ‘दाम करी काम’ ही प्रवृत्ती वाढल्यामुळे आज सर्वात उंच ठिकाणी पैसा जाऊन बसलाय. सगळी सोंगं घेता येतात पण पैशाचं सोंग घेता येत नाही, ही म्हण सर्वकाही सांगते. एक काळ असा होता…पैसा नगण्य मानला जात होता. पण काळाच्या ओघात पैशाने स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं. आज जळी, स्थळी,काष्टी, पाशानी सर्वत्र केवळ पैसा पैसा आणि पैसा महत्त्वाचा आहे. तेव्हा आज बुधवारीय काव्यरत्न स्पर्धेसाठी मराठीचे शिलेदार समूहाचे सर्वेसर्वा आदरणीय राहुल सरांनी ‘दुनिया पैशाची’ हा विषय दिला आणि सर्वांना स्वानुभवातून लिहण्यास व्यासपीठ दिले. सर्वजण खूप छान व्यक्त झालात. आपल्या कसदार लेखणीनं प्रतिभेला चमक दिली. तेव्हा सर्वप्रथम तुम्हा सर्वांचे मनापासून अभिनंदन..!
पण थोडं काही….. अर्थात आज सल्ला माणुसकीचा…!
पैसा कितीही असला तरी तो कमवतांना कधीही माणुसकी सोडू नका. माणसाला जिंकायचे ते केवळ आपुलकीनेच. कारण, वेळ, पैसा, सत्ता आणि शरीर एखाद्या वेळेस साथ देणार नाहीत. पण माणुसकी, प्रेमळ स्वभाव व आत्मविश्वास कधीही तुम्हाला एकटं पडू देणार नाही.
शेवटी एकच सांगेन… माणूस म्हणजे देव आणि माणुसकी हाच धर्म… पैसा, संपत्ती स्वार्थाहून श्रेष्ठ आहे. तुम्ही केलेले सत्कर्म. आज जरा वेगळा सल्ला पण निश्चितच कवीमनाला आवडेल हा विश्वास आहे.
सौ सविता पाटील ठाकरे,सिलवासा
मुख्य परीक्षक,प्रशासक, लेखिका, कार्यकारी संपादक
मराठीचे शिलेदार समूह