
नातं
मूल जन्माला आले की लगेच त्याचे अवतीभवती असणाऱ्या सर्वांशी अनोळखी नातं तयार होतं.त्या दिवसापासून या विश्वाची ओळख त्याला व्हायला लागते. एकेक दिवस पुढे जातो तसा नात्याची गुंफण समजू लागतो आणि एक दिवस हे माझे नातेवाईक आहेत या विचाराने बांधल्या जातो. नाते तसे जवळचे, रक्ताचेच असले पाहिजे असे नाही.पण कधी कधी रक्ताच्या नात्यापलीकडेही अनोळखी नाते जवळचे होतात. त्यांच्या गोड बोलण्याने, आपुलकीच्या वागण्याने, स्वभाव गुणांनी मनं जिंकल्या जातात. तसे हे नाते जपायला लागतो. परिवारापासून हल्ली दूरवर राहणाऱ्या व्यक्तींना असे नातेसंबंध जोडावेच लागतात.नाते जोडले की ते टिकवून ठेवणे पुन्हा जिकरीचे काम आहे.
‘मला काय करायचे आहे ‘ ही भावना ठेवणारे लोक फारसे लावून घेत नाहीत. पण काहींना मात्र कायम आधाराचीच गरज असते. जीवनात सुद्धा एकाकी जपणारी हळवी नाती असतात. जमिनीवर वाढणारी लता मोठ्या झाडांचा आधार घेत नाते जोडते. पशुपक्षी,प्राणी हे सुद्धा मानवाशी जिव्हाळा लावतात. शेतकरी बैलाला थाप देऊन’ चल आता शेतीच्या कामाला लागू या’ असे सुचवतो.तर दुरूनच मालकाला किंवा घरातील सदस्यांना येताना पाहून कुत्र सुद्धा आनंदाने शेपटी हलवतो. जणू काय किती वेळ वाट बघतो आहे, आता प्रतीक्षा संपली असेच सांगतो.
नुकतीच एक बातमी बघितली. दहा महिन्याच्या मूलाला ठेवून एक महिला देशाच्या रक्षणासाठी कर्तव्यावर रुजू झाली.कोणतं नातं श्रेष्ठ म्हणायचे ?देशाचे नातं की माय लेकराचं?नातं दोन्हीही अनमोल. कुटुंबातील एक पुरुष वडील,भाऊ, काका,मामा ,मुलगा मित्र अशा भूमिका बजावतो तर स्त्री आईच्या पलीकडे जाऊन ताई, काकी, मामी ,मैत्रीण ,मुलगी अशा अनेक प्रकारचे कर्तव्य बजावते.वेळप्रसंगानुसार नात्याचे स्वरूप बदलत जाते. आम्ही शाळेत जातो तेव्हा शाळेतील मुलाप्रतीचा जिव्हाळा आम्हाला आमच्या कर्तव्याच्या नात्याशी बांधतो. मग ती मुले पालकांपेक्षा आपल्या शिक्षकांना जास्त मानतात.आमच्या शिक्षिका जे म्हणतील तेच खरं या मतावर ठाम असतात.
नुकत्याच एका लग्नामध्ये एक मुलगा आपल्या ताईसाठी गाणं म्हणताना गोड गोजिरी दिसणारी ताई आता दुसऱ्या घरी जाणार हे लडिवाळ पणे सांगतो. लग्न म्हणजे दोन जीवांना जोडणारा दुवा आहेच. पण त्याही पलीकडे दोन कुटुंब सुध्दा एकत्र येतात नवे नाते घेऊन. शेवटी काय नात्यानेच नाती गुंफली जातात. ती जपायची कशी हे आपल्या हातात असते. शब्दांच्या वज्रप्रहाराने तुटण्यापेक्षा साजूक तुपाने चविष्ट बनवणे हे केव्हाही चांगले नाही का?
वनिता महादेव लिचडे
ता.पवनी, जि.भंडारा
===========