वाचू आनंदे…लिहू आनंदे…बोलू आनंदे… सुखदुःखाच्या सरींना झेलू आनंदे….!; वैशाली अंड्रस्कर

वाचू आनंदे…लिहू आनंदे…बोलू आनंदे… सुखदुःखाच्या सरींना झेलू आनंदे….!; वैशाली अंड्रस्करपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

*लाभले आम्हांस भाग्य, बोलतो मराठी*
*जाहलो खरेच धन्य, ऐकतो मराठी…..*
*धर्म पंथ जात एक, जाणतो मराठी…..*
*एवढ्या जगात माय, मानतो मराठी…..*

कविवर्य सुरेश भट यांनी लिहिलेल्या उपरोक्त ओळी दरवर्षी २७ फेब्रुवारी मराठी भाषा दिनाला समाजमाध्यमांमध्ये फिरत असतात. कौतुकास्पद वाटते सारे काही. जन्म देणारी आई आणि मराठी भाषा यांना माय म्हणून उच्चारताना आज आई आणि मातृभाषा या दोघींची पण ओढ राहिलेली आहे का मनाला…?

होय मान्य आहे…जग पुढे चाललयं… आंतरराष्ट्रीय स्तरावर इंग्रजी भाषेचा बोलबाला आहे… म्हणून काय मातृभाषा अडगळीत टाकायची…? बाळ पहिलं अक्षर मम..उच्चारतं तेव्हा किती आनंद होतो मनाला…ह्याच अक्षरांचा संचय कानात साठवून तो मामा…काका…बाबा…आई म्हणतो तेव्हा जीव जणू ओल्या दवांत न्हाहतो… हळूहळू बाळ मोठा होतो…त्याच्या पोटाच्या भुकेसोबतच ज्ञानाची भूक वाढत जाते… आणि नेमकी हीच वेळ असते त्याला विचारांचे पूरक खाद्य देण्याची… त्याच्या वयानुसार त्याच्या ज्ञानाची भूक भागविणारे छापील साहित्य देण्याची. चित्रे अक्षरे शब्द यांच्या समुच्चयातून डोळे आणि मन तृप्त करणारी पुस्तके, मासिके खरोखरच बाळाच्या शारीरिक वाढीसोबतच मानसिक वाढीसाठी पूरक ठरतात. नित्यनेमाने येणाऱ्या वर्तमानपत्रात आठवड्यातून एकदा बालविभाग राखून ठेवलेला असतो. तसेच उन्हाळी सुट्टयांचे उपक्रम वर्तमानपत्रांतून राबविले जातात. बस्स…हीच वेळ असते वाचन संस्कृती रूजविण्याची. पण आज किती पालक या गोष्टीकडे लक्ष देतात…? स्वतःच वाचनसंस्कृतीपासून दूर गेलेले पालक कसे वाचन संस्कार रूजवणार पाल्यांत…?

या सर्व बाबींचा आज येथे ऊहापोह करण्यास कारण म्हणजे मराठीचे शिलेदार समूहात शनिवारीय काव्यस्तंभ स्पर्धेसाठीचा विषय ‘ आम्ही मराठी वाचक’. वाचक आणि त्यातल्या त्यात मराठी वाचक म्हणताना मन खट्टू होते. किती जण खरेच जाणीवपूर्वक वाचतात ? डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी रूजवलेला ‘वाचाल तर वाचाल’ हा विचार तर सर्वश्रुतच आहे. सामाजिक विषमतेच्या गर्तेत बुडालेल्या समाजाला जागृत करण्यासाठी ज्ञानाची कास धरण्याचा, वाचन करण्याचा संदेश बाबासाहेबांनी बहुजनांना दिला.

खरेतर वाचन मग कुठलेही असो ज्ञान, मनोरंजन यांसोबतच माणूस, समाज, संस्कृती यांचे लिखित स्वरूपात आकलन करून घेण्याचा सहजसोपा मार्ग म्हणजे वाचन. पण हा मार्ग आज खुंटलेला आहे. आपल्या दैनंदिन गरजांसोबतच हौसेमौजेखातर पैशांची उधळपट्टी करणारा समाज पुस्तकांवर किती खर्च करतो हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. गरजेपोटी अभ्यासाची पुस्तके खरेदी केली की झाले इतिकर्तव्य. समृद्ध सार्वजनिक वाचनालये ही वाचन संस्कृती वाढविणारी ठिकाणे आज अडगळीत पडल्यासारखी झालेली आहेत. मला इथे आपणा सर्वांना कळकळीने विनंती करून सांगावेसे वाटते….एक परिपूर्ण व्यक्तिमत्त्व घडण्यासाठी, स्वतःतील आत्मविश्वास वाढविण्यासाठी खरोखरच वाचनाची गरज आहे. विपुल वाचन छंदातून जितके ज्ञान घेता येईल तेवढे घ्या. ते कधीच वाया जाणार नाही. आपल्या जीवनाच्या अंतापर्यंत ही पुस्तके आपली मार्गदर्शकाची भूमिका पार पाडेल. जितके जास्त वाचणार तितकी शब्दसंपत्तीत भर पडेल. शब्दांची अचूक ओळख होऊन शुद्धलेखनाचा सराव होईल. संवादकौशल्य वाढेल. आपल्या भावनांची मांडणी योग्य प्रकारे करता येईल. इतरांचा भावनाविष्कार समजणे सोपे होईल आणि या सर्वांसाठी आपल्याजवळ आज विविध साधने उपलब्ध आहेत. कुठल्याही माध्यमातून वाचा. छापील वाचा, डिजिटल वाचा. रोजची वर्तमानपत्रे, विविध मासिके, साप्ताहिके, पाक्षिके, वार्षिकांक अशी कितीतरी साधने आपल्या हाताशी आहेत. फक्त परीक्षा पास करण्यासाठी नव्हे तर अनुभवाची कक्षा विस्तारण्यासाठी ‘आम्ही मराठी वाचक’ होणे गरजेचे आहे. आपण सर्व शिलेदारांनी विषयाच्या अनुषंगाने खूप छान लिहिलेले आहे. सर्वांचेच खूप खूप अभिनंदन…. आणि भावी वाटचालीस भरभरून शुभेच्छा….!

सौ.वैशाली उत्तम अंड्रस्कर, चंद्रपूर
कवयित्री/लेखिका
सहप्रशासक/मुख्य परीक्षक/संकलक
©मराठीचे शिलेदार समूह

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles