
“विठू माऊली माझी” संतवाणीत रंगली संध्याकाळ
अमृता खाकुर्डीकर, पुणे
पुणे:आषाढी एकादशी निमित्त सर्व वातावण भक्तीरंगात रंगलेले असताना बालगंधर्व रंगमंदिरात एक संध्याकाळ अभंग रंगात भिजून गेली. बाहेर पावसाच्या सरी कोसळत असताना संतवाणीत रसिकांना भिजवणारा
“विठू माऊली माझी” या भक्तीसंगीतमय कार्यक्रमाचे आयोजन आषाढी एकादशी निमित्त शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान यांच्या वतीने करण्यात आले होते.
प्रसिध्द गायक सचिन इंगळे यांचे सुरेल संयोजन असलेल्या या कार्यक्रमात स्वतः सचिन इंगळे यांच्यासह गायक मयुर महाजन आणि गायिका मेघना सहस्त्रबुध्दे खंडकर यांच्या स्वरातील एकापेक्षा एक सुंदर अभंगांनी रसिकांना तृप्त केले. ‘चंदनाची चोळी माझे अंग अंग जाळी’ आणि ‘नको देवराया अंत आता पाहू’ अशा काही निवडक अभंगांना श्रोत्यांनी वन्समोअर देऊन भरभरून प्रतिसाद दिला आणि समारोपाला विठू
नामाच्या गजराने सारे सभागृह दुमदुमून गेले.
नाट्यअभिनेते-दिग्दर्शक रवींद्र खरे यांनी या सांगितिक मैफलीचे रंगतदार निरूपण करून कार्यक्रम अधिकच रःगतदार केला. वाद्याची
साथसंगत अमृता ठाकूरदेसाई,निलेश देशपांडे, केदार मोरे आणि सोमनाथ साळुंके यांनी केली. तबल्यावर होते प्रसिध्द तबलावादक राजेंद्र दूरकर.
आषाढी-कार्तिकी एकादशीला अभंगवाणीचा असा कार्यक्रम दरवर्षी शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान यांच्यावतीने आयोजित करण्यात येतो व तो सर्वांसाठी खुला असतो.