
राज्याला दोन अर्थमंत्री मिळणार?
मुंबई:महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय घडेल? याचा काहीच भरोसा नाही. राज्याच्या राजकारणात सातत्याने सर्वसामान्यांना धक्क्यावर धक्के देणाऱ्या आणि अवाक करणाऱ्या अशा घडामोडी घडत आहेत. नुकतंच काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते असलेले अजित पवार हे सत्तेत सहभागी झाले. त्यानंतर राज्याला पहिल्यांदाच दोन उपमुख्यमंत्री मिळाले. त्यानंतर आता अशीच एक नवी अनोखी गोष्ट घडण्याचे संकेत मिळत आहेत. महाराष्ट्रात आता दोन अर्थमंत्री असणार आहे. सूत्रांकडून याबाबतची सर्वात महत्त्वाची बातमी समोर आली आहे.
राज्य मंत्रिमंडळाचा तिढा सुटत नसल्याने अजित पवार आज दिल्लीत दाखल झाले आहेत. त्यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल आणि मंत्री हसन मुश्रीफ हे देखील दिल्लीला गेले आहेत. अजित पवार यांना अर्थ खातं देण्यास शिवसेनेचा विरोध आहे. याशिवाय आणखी दोन खात्यांवर तिढा निर्माण झाला आहे. असं असताना आता चर्चेतून मधला मार्ग निघण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्याला दोन अर्थमंत्री मिळणार आहेत. या दोन्ही मंत्र्यांना कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा असेल. तसेच दोघांना समसमान अधिकार असणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.