सेवानिवृत्त शिक्षकांचे शिक्षणमंत्र्यास पत्र..!!

🖋️🖋️🖋️🖋️🖋️🖋️🖋️🖋️
*सेवानिवृत्त शिक्षकांचे*
*शिक्षणमंत्र्यांना पत्र*…
🖊️🖊️🖊️🖊️🖊️🖊️🖊️🖊️
शिक्षण मंत्री साहेब,
नमस्कार…
👏👏👏👏👏पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

साहेब पेपरात आलेली तुमची बातमी वाचली. 20 हजार रुपयांवर सेवानिवृत्त शिक्षक भरणार ही बातमी वाचून मनाला लई वेदना झाल्यात. क्षणभर वाटलं..

*देवा तुझ्या जगी*
*काय विपरीत झालं*

*वळचणीचं पाणी*
*आढ्याला गेलं*

साहेब ..तुम्ही आमची किंमत 20 हजार केल्याबद्दल मी या पत्राद्वारे तुमचा जाहीर निषेध करतो. साहेब.. आम्हाला नोकरीवर घ्या म्हणून आम्ही काय तुम्हाला पत्र पाठवलं होतं का मागणी केलती का ? आम्ही मोर्चे निदर्शने केलते का? यापैकी काहीच नाही…!

मग तुम्हाला ही उपरती का सुचली. याचा विचार करून आम्हाला तुमच्या बुद्धीची कीव करावी वाटते. साहेब गेली दहा वर्ष झालं गोरगरिबांच्या लेकरांना शिकवायला पुरेसे शिक्षक तुम्ही नेमले नाहीत. त्यांचे शैक्षणिक नुकसान तुम्ही केलं. राज्यात सुमारे 50 -60 हजार शिक्षक जागा रिक्त आहेत. 6 ते 14 वयोगटाला मोफत शिक्षण देणं ही सरकारची जबाबदारी आहे. या घटनेतील कलमाला तुम्ही हरताळ फसलात. एक जबाबदार मंत्री म्हणून तुम्ही राजीनामा दिला पाहिजे..!

पण याचा ही दोष तुम्हाला न देता तुम्हाला शिकवणारे माझे गुरुजीच कुठेतरी कमी पडले असतील असं म्हणून तुमचा तोही गुन्हा आम्ही आमच्याच पदरात घेत आहोत. कारण अनेक विद्यार्थ्यांना चुकीबद्दल क्षमा करण्याची आम्हाला सवय आहे. कारण आम्ही गुरु आहोत. साहेब, वयाच्या 58 व्या वर्षी 35 -36 वर्ष नोकरी करून नियत वयोमनानुसार आम्ही सन्मानाने सेवानिवृत्त झालो आहोत. आमच्या सेवानिवृत्तीला
‘माझे गुरुजी’ म्हणून आदराने कार्यक्रमाला येणारे विद्यार्थी आज माझ्याकडे कलूशीत नजरेने पाहतील. हे मनाला पटतच नाही हो..!

साहेब , आम्ही सेवानिवृत्त म्हणून सुखा समाधानांने जगतो आहोत. दोन वेळचं जेवण मिळावं इथपर्यंत आर्थिक परिस्थिती आमची आहे. तारुण्यातली उभी हयात सरकारी नोकरीसाठी घालवली. चाकरीसाठी घालवली म्हणून मिळणारी म्हातारपणातली पेन्शन दोन वेळचं जेवण सुखानं देते आहे. तीस-पस्तीस वर्षाची सरकारी चाकरी करून, जीव दमून गेलाय साहेब. आयुष्याच्या उतरतीला मुलाबाळात, नातवंडात रमण्याचे चार दिवस. साहेब आयुष्यात सोबत काहीच येणार नाही. येईल तो फक्त मुलाबाळांचा आशीर्वाद. विद्यार्थ्यांचा आशीर्वाद. साहेब जगज्जेता सिकंदर सुद्धा मोकळ्या हाताने गेला हे आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना शिकवले…!!

या वयात पुन्हा जर तुमच्या नोकरीत आम्ही आलो तर नोकरीच्या आशेने गावागावात वाडीवस्तीवर डीएड बीएड करून बसलेल्या मुलांच्या समोर आम्ही काय आदर्श ठेवावा? साहेब तुम्हाला खरं सांगतो. आज जगात आपल्या देशाची लोकसंख्या एक नंबर वर गेलीय. तुम्हीच म्हणता सरकार किती जणांना नोकरी देऊ शकणार?. त्यामुळे तरुणांनी उद्योगाकडे वळावे. आणि पुन्हा तुम्ही म्हाताऱ्यांना नोकरीत घेत असाल तर तुम्ही मांडूळासारखं दुतोंडी वागताय असं नाही का होणार….!!

साहेब, तरुण मुलं नोकरीवर घेतल्यावर पगार मागतील. पेन्शन मागतील. ते परवडणार नाही या भीतीने तुम्ही हा निर्णय घेत असाल; तर अनुभवी माणूस म्हणून तुम्हाला सांगतो …

*साडी घेणे महागात पडेल*
*म्हणून बायको करायचं*
*कोण थांबलय का साहेब?*

जरा तुम्ही बी भ्रष्टाचार कमी करा. तुम्ही बी पगार आणि भत्ते कमी घ्या. तुम्ही बी लवकर रिटायर व्हा. दुसऱ्याला मंत्री होऊ द्या. आता तुम्ही आमदार खासदार मंडळी सरकारी पगार घेताय, पेन्शन घेताय म्हटल्यावर सरकारी नियमाने तुम्ही सुद्धा 58 व्या वर्षी रिटायर व्हा. असा कायदा करा म्हणजे नवी पिढी राजकारणात येईल… पदावर येईल. खरं तर तुम्हाला सांगतो. वाढत्या लोकसंख्येचा विचार करून आमची सुद्धा रिटायरमेंट आता तुम्ही 58 वरून 55 वर आणा..!

म्हणजे नव्या पिढीला नोकऱ्या मिळतील आणि जुनी पिढी पैसा सचोटीन वापरेल. साहेब बदललेल्या काळात विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात, या धावत्या जगात आपल्याला योग्य वेळी थांबता आलं पाहिजे. आम्ही आता या धावत्या जगाबरोबर पळू शकत नाही आणि म्हणून…. धावत्या जगाबरोबर पळायला तयार असणा-या या नवी पिढीची भरती तुम्ही तात्काळ करा. हे आमच्या सेवानिवृत्त बांधवांच्या वतीने तुम्हाला कळकळीची विनंती करतो आणि आपण काढलेला हा जीआर हे सेवानिवृत्त शिक्षकांच्या भरतीचे पत्र आपण परत घ्या…!

नाहीतर आम्हाला गावोगावाच्या चौकात त्याची होळी करून पावसाळ्यातच शिमगा साजरा करायची वेळ आणू नका. हे वेगळं सांगण्याची गरज नसावी. साहेब देश चालवण्यासाठी राज्य चालवण्यासाठी तुम्ही जेवढ्या परीक्षा दिल्या नाहीत ना. त्यापेक्षा कितीतरी अधिक परीक्षा 40 लेकरांचे भविष्य घडविण्यासाठी माझ्या तरुण मुलांनी दिलेल्या आहेत.(डीएड, बीएड, एमएड ,टेट , टीईटी नेट,…)

आज बेकार असल्यामुळे त्यांची लग्न होईनात… जोडीदार मिळेना झालाय….आई वडील बेचैन आहेत. अनेक जण एजबार झालेत. डोक्याची केस चालली साहेब पण तुम्हाला त्याचं केस भर दुःख नसावं याचं फार वाईट वाटतं आम्हाला. साहेब माझे हे पत्र वाचून..नोकरीच्या आशेने थांबलेल्या सुशिक्षीत बेकार लेकरांचे दुःख पाहून तुम्हाला ही थोडी कणव येईल असं वाटतं. तेव्हा हे पत्र मिळताच..
ताबडतोब सेवानिवृत्त शिक्षकांना नोकरीत घेण्याचा हा तुघलकी निर्णय मागे घ्याल ही अपेक्षा ठेवतो…!

आणि थांबतो …

(पुन्हा नोकरीवर बोलवाल…
तर माझ्या हातात साठी नंतर काठी आलेली आहे हे विसरू नका)

आपला नम्र
एक सेवानिवृत्त शिक्षक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,876FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles