शेतशिवारात नववर्षाला ‘साजुणी’चा थाट

शेतशिवारात नववर्षाला ‘साजुणी’चा थाट



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

मांडवस :नव्या हंगामाच्या मशागतीचा प्रारंभ

कृषीजीवनाचे नवे वर्ष रविवारी सुरू होत आहे. शहरी संस्कृतीत गुढीपाडवा म्हणून साजरा होणारा हा दिवस शेतशिवारांमध्ये मात्र ‘मांडवस’ म्हणून साजरा केला जाणार आहे. भल्या पहाटे ‘साजुणी’चा विधी आटोपून नव्या सालातील मशागतीचा पवित्र अंत:करणाने प्रारंभ केला जाणार आहे. गारपीट, बोंडअळी, नापिकी, बाजारातला बेभाव अशा संकटांना तोंड देत खचून गेलेला शेतकरी पुन्हा नव्या उमेदीने गुढी पलटविणार आहे.

चैत्राच्या पहिल्या दिवशी कृषीवलांच्या नव्या सालाची सुरवात होते. जुने पीक काढून मोकळे झालेल्या शेतात उन्हाळवाही सुरू करण्याचा हा दिवस. जुने विसरून नव्या पेरणीची सज्जता. भल्या पहाटे झुंजूमुंजू अंधारातच सजविलेले औत घेऊन शेतकरी शेतात हजर होणार. रानात बैलांच्या गळ्यातील टिलमिल्यांची रूणझुण गुंजणार. तेथे औताची, बैलजोडीची आणि गड्यामाणसांची पूजा करणार. शेतकरी-मजूर एकत्र बसून दही-कन्या भक्तिभावाने खाणार. सूर्याचा पहिला किरण उगवण्यापूर्वीच शेतात मानाचे पाच तास वखरणार. हीच नव्या वर्षाची ‘साजुणी’ होय.

साजुणी आटोपून पुन्हा गावात परतलेले शेतकरी मारुतीच्या पारावर जाऊन ईश्वराची करुणा भाकणार. नव्या सालात संकटांची गुढी पालटू दे म्हणणार. दुपारी शेतात लेकराबाळांसकट जाऊन नव्या तुरीच्या घुग-या वाटणार… वर्षानुवर्षे चालणारी ही ‘मांडवस’ आजही तेवढ्याच उत्साहाने साजरी केली जात आहे.

मात्र, शेतक-यांना विसरलेला शहरी समाज आज पहाटेचे औत बघायला तयार नाही. शेतकरी आत्महत्यांच्या घटना ऐकून नाक मुरडणारा समाज शेतक-यांचा हा उत्साह बघत नाही.
पाच लाखांहून अधिक शेतकरी लोकसंख्या असलेल्या यवतमाळ जिल्ह्यात गुढीपाडव्याची पहाट ‘साजुणी’साठी पवित्र मानली जाते. शहरी ‘पाडवा पहाट’ दिवसेंदिवस गर्दी खेचत असताना गावा-गावात कष्टाची परंपरा सांगणा-या ‘साजुणी’कडे डोळेझाक केली जात आहे. पण शेतक-यांना त्याचे दु:ख नाही. खंत नाही.

चार लाख रोजगारांचे ‘रिन्यूव्हल’
मांडवशीच्या पहाटे शेतशिवारात उन्हाळवाहीची सुरूवात होत आहे. वर्षभर शेतकाम करण्यासाठी शेतकरी याच दिवशी नवे सालगडी नेमतात. तर अनेकजण जुन्याच गड्याला ‘कन्टीन्यू’ करतात. कुणाचाही लेखी करार नसतो. पण शेतकरी आणि सालगड्याची भावनिक गुंतागुंत पक्की आहे. तोंडी बोलाचालीवर साल ठरते. अन् वर्षभर इमानेइतबारे कष्ट केले जातात. यंदाच्या मांडवशीला जिल्ह्यात सुमारे चार लाख सालगड्यांच्या रोजगाराचे असेच तोंडी नुतनीकरण होणार आहे. खेड्यातल्या रोजगारात एवढी मोठी उलाढाल करणारा हा दिवस कृषीक्षेत्राच्या वाटचालीतला मैलाचा दगड आहे. सर्वांना मांडवशीच्या हार्दिक शुभेच्छा.,!!

संपादक
‘साप्ताहिक साहित्यगंध’
marathicheshiledar6678@gmail.com

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles