‘तुझेच धम्मचक्र हे फिरे जगावरी’; प्रशांत ठाकरे

तुझेच धम्मचक्र हे फिरे जगावरी’



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

‘व्यक्तीला जाणीव करून देते तेच शिक्षण’ अशी शिक्षणाची व्याख्या करणाऱ्या महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या जयंती निमित्त प्रथमतः विनम्र अभिवादन. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी गुलामाला त्याच्या गुलामीचे गुपित सांगताना सांगितले की, “उपासमारीने शरीराचे शोषण कमी झाल्यास माणूस अल्पायुषी होतो. तसेच, शिक्षणाच्या अभावी तो निर्बुद्ध राहिल्यास जिवंतपणीच दुसर्‍याचा गुलाम होतो.” शतप्रत खरे आहे हे.!! डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणजे विचारांचा भारताला लाभलेला आजवरचा सर्वात मोठा वारसा होय. 14 एप्रिल 1891 रोजी सुभेदार रामजी मालोजी सकपाळ व भिमाबाई यांच्या पोटी एक नररत्न जन्माला आले. वयाच्या पाचव्या वर्षी भीमरावांना शाळेत घातले आणि वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी त्यांचे मातृछत्र हरपले.

पण असं म्हणतात ना “मुलाचे पाय बाळ पाळण्यात दिसतात”… अनंत अडचणींचा सामना करत आपली जीवननौका पैलतीरी नेणारे बाबासाहेब म्हणजे, माणसाला माणूस म्हणून ओळख मिळवून देणारा खरा प्रज्ञावंत होत. आचार आणि विचारांची सांगड घालणारे बाबासाहेब म्हणजे तत्त्वज्ञानाला कृतीची जोड देणारा महामानव होय. “जोपर्यंत शिक्षणाची गंगा दारोदारी पोहोचत नाही; तोवर माणसाला पशुचेच जीवन जगावं लागेल”, हे त्यांनी खूप आधीच ओळखलं होतं. “शिक्षण हेच समाज परिवर्तनाचं प्रभावी माध्यम आहे”. ज्यातून मानवाला कर्तव्य आणि हक्काची जाणीव होते तेव्हा त्यांनी शिक्षणाचे महत्त्व विषद करताना म्हटलं होतं,”शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे ते जो पिईन तो माणूस गुरगुरल्याशिवाय राहणार नाही”.

तत्कालीन परिस्थितीत शिक्षण ही विशिष्ट लोकांची मक्तेदारी होती,जी त्यांनी मोडून काढली. समाजाच्या सर्व थरांपर्यंत शिक्षण नेले पाहिजे यासाठी आग्रही भूमिकाही घेतली. प्रज्ञा,शील व करुणा ह्या त्रिसुत्रीवर कार्य करताना अपेक्षित ध्येय साध्य करण्याचा राजमार्ग म्हणजे शिक्षण ही त्यांची भूमिका त्यांनी पटवून दिली. वाचता, लिहिता येणे म्हणजे शिक्षण हा शिक्षणाचा संकुचित अर्थ दूर सारून शिक्षणातून सुसंस्कृत व गुणवत्तायुक्त मन घडवणं ही काळाची गरज आहे असे ते नेहमी म्हणत.

बाबासाहेबांनी युक्तीला नेहमीच कृतीची जोड दिली, उच्च शिक्षणाचे महत्त्व लक्षात घेऊन त्यांनी 1946 ला पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना करून मुंबईला सिद्धार्थ कॉलेज तर औरंगाबादला मिलिंद महाविद्यालय सुरू केले. ‘शिका, संघटित व्हा व संघर्ष करा’ हा मानवी उद्धाराचा राजमार्ग त्यांनी संपूर्ण लोकांना पटवून दिला. त्याकाळी सामाजिक विषमतेचा ज्वर खूप मोठ्या प्रमाणात फैलावलेला होता, तो कमी करण्याचे एकमेव औषध म्हणजे शिक्षण होय यावर त्यांचा दुर्दम्य विश्वास होता. महात्मा फुलेंनी जो शिक्षणाचा विस्तृत पाया घालून दिला होता; त्यावर पक्की इमारत उभी करण्याचं काम बाबासाहेबांच्या शैक्षणिक विचारधारेने केले. स्वतः प्रथमता त्यांनी लंडनमधून ‘बॅरिस्टर’ची पदवी संपादन केली व संपूर्ण आयुष्य शोषित समाजाच्या उद्धारासाठी वेचताना त्यांनी स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या मानवी मूल्यांचे अधिष्ठान उभे केले.

जीवनात शिक्षणाला सर्वोच्च स्थानी ठेवून शिक्षणामुळेच मानवी मेंदू प्रगल्भ होतो,ज्ञानाच्या कक्षा रुंदावतात ,चांगले व वाईट यातील फरक समजतो,सामाजिक जाणीव निर्माण होते व कर्तव्य परायणतेचा पाठही गिरवला जातो यावरती ते ठाम होते. उक्तीला कृतीची जोड देणाऱ्या या महामानवाने घटनेचे कलम 45 अन्वये 18 वर्ष पूर्ण होईपर्यंत मोफत व सक्तीचे शिक्षण देण्याची जबाबदारी शासन व्यवस्थेवर देऊन पुरोगामी भारताची सर्व जगाला ओळख करून दिली.

एवढेच नाही तर कोणत्याही शैक्षणिक संस्थेतून धार्मिक शिक्षण देता येणार नाही ही तरतूद ही केली जे त्यांच्या सर्वधर्मसमभावाचे दर्शन घडवते. शिक्षण हे समाज परिवर्तनासोबत क्रांतीचे प्रभावी माध्यम आहे व त्यातूनच अंधश्रद्धा,अनिष्ट परंपरा यांचा बीमोड शक्य असल्याची जाणीव विषद केली. महिला शिक्षणाला गती दिली त्यांच्या शैक्षणिक विचारधारेवर त्यांचे बौद्धिक गुरु जॉन ड्युई यांचा प्रभाव पहावयास मिळतो.

अन्न,वस्त्र, निवारासोबत शिक्षण ही मानवाची मूलभूत गरज असल्याचे मत त्यांनी मांडले. स्वातंत्र्य, समता,बंधुता,न्याय आणि नैतिक चारित्र्य हे मुला-मुलींमध्ये रुजविण्याची त्यांची भूमिका होती. बाबासाहेबांचे राजकीय शिक्षण आणि शैक्षणिक कार्य अशी दुहेरी भूमिका आपल्या जीवनात साकार केली. “आम्ही भौतिक फायद्यांचा त्याग करू शकतो, परंतु सर्वांच्या शिक्षणाचा लाभ पूर्ण प्रमाणात मिळण्यासाठी आम्ही आमचे हक्क आणि संधी सोडू शकत नाही ” हे त्यांचे विचार त्यांनी तत्कालीन विधानसभेमध्ये ठासून सांगितले होते. ज्ञानप्राप्तीचा मोठा आधार केवळ पुस्तके आहेत त्यासाठी त्यांना वाचनाचा व लेखनाचा मोठा छंद होता जवळपास 50 हजार ग्रंथ त्यांच्या घरातील वाचनालयातच उपलब्ध होते. अशा या महामानवाची थोरवी कितीही गायली तरी अपूर्णच आहे. ‘महामानवा तुझेच धम्मचक्र हे फिरे जगावरी’ आजच्या दिवशी त्यांच्या स्मृतींना त्रिवार अभिवादन.

प्रशांत ठाकरे, सिलवासा
दादरा नगर हवेली (केंद्रशासित प्रदेश)
============

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles