फाल्गुन
रम्य हसरी पहाट
घेवूनी थंड गारवा
कवेत घेतोय मज
मोहक ऋतू बरवा
रूप अनोखे भासे
प्रभाती भास्कराचे
त्याच्या केशर रंगात
रंग उधळले मनाचे
कानी पडले सुस्वर
कोकीळ गीत गाणी
देह सुखावला आज
बघता क्षण डोळ्यांनी
हळू डोकावले रानात
समोर वृक्ष उभा पलाश
त्यागून तोही पर्णभार
मुक्त मजसाठी बाहूपाश
मनात भिनभिनलेल्या
रंगाना ना मिळे उसंत
फाल्गुन खुणावतोय
बहरू दे ना आज वसंत….
बहरू दे ना आज वसंत…..
माधुरी काळे
वणी जिल्हा यवतमाळ
============