फुंकर
फुंकर मारली चुलीमंदी
गेलं सारं धुपाट विरून
धडधड पेटली लाकडं…
भगभगला गरम जाळ
कोरपाटभर थापली भाकर
शेकाया टाकली खापरावर
धगधगत्या इस्तवानं आली
गोल गरगर टरारून वर….
घातलं तिखटमिठ वरून
कांदालसन ठेसून टाकला
कष्टाच्या भाकरीनं धन्याचा
नाय जीव कदी बी मातला
कष्टकऱ्याचा धंदा इमानीचा
त्याले घरधनीनचा हातभार
दिस गरिबीचे असतील परि
एकमेकां घालती मायेची फुंकर
वैशाली अंड्रस्कर,चंद्रपूर
=========