जीवन तत्वांनी बहरलेला ‘अबोल शब्दांचा स्पर्श’; स्पर्शगंध मनाचा

जीवन तत्वांनी बहरलेला ‘अबोल शब्दांचा स्पर्श’; स्पर्शगंध मनाचा



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

मराठवाड्यातील तालुका पालम, जिल्हा परभणी येथील रहिवासी कवी, लेखक ‘बी.एस.गायकवाड सर’ हे प्राथमिक शिक्षक असून, एका प्राथमिक शिक्षकामध्ये आवश्यक असणारे सर्व मूल्य , तत्व त्यांच्या लेखणीतून ” स्पर्शगंध मनाचा” या काव्यसंग्रहाच्या माध्यमातून त्यांनी रसिकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केला आहे. शृंगार, प्रेम, अश्लीलता यात रमणारे आजकालचे नवकवी यांना मात देत कवी जीवन तत्त्वे, नीतीमूल्ये, तत्त्वज्ञान यामार्फत समाज प्रबोधन करण्याचे महान कार्य हाती लेखणी घेऊन करत आहेत असे जाणवल्याशिवाय राहत नाही. खडतर आयुष्य जगत असतांना, काव्याबरोबरच कवी एक उत्कृष्ट चित्रकार असून वक्तृत्व शैलीवर आपली पकड घट्ट धरून आहेत. त्याचबरोबर सुत्रसंचालनाची आवड असणारे कवी आपल्या आयुष्यात विविध छंद जोपासतांना दिसत आहे. त्यांचा जीवनाकडे पाहण्याचा “सकारात्मक ” दृष्टीकोन वाचकाला प्रचंड उर्जा देऊन जातो. तो समायोजन, स्नेहवलय, प्रेम काय असतं? या काव्यांमधून सहज,सरळ वाचकांना अनुभवायला मिळतो. आयुष्य म्हटले की, सुख दुःख येणारच त्यांना न घाबरता त्यात गुरफटून न जाता आपले छंद, आवड यांना वेळ देऊन आनंदी जीवन जगावे हे सांगतांना कवी म्हणतात –
“माझा छंद मी जोपासतो आहे
मनोमन करतो आहे उपासना,
आळस थकवा निघून जाईल
मिळेल नवसंजीवनी जीवना.”

जीवनाला नवसंजीवनी प्राप्त करण्यासाठी ‘माझा छंद ‘ हे काव्य सहजच निर्मिले गेले असावे. जीवन ही रंगभूमी आहे, दुःखाला कुरवाळत बसण्यापेक्षा त्याला दूर सारून इतरांबरोबर समरस होऊन हसत रहावे. कारण, दुःखावर काळ हेच औषध ठरते.समस्यांवर हळूवार फुंकर घालून पुढे चालावे हे सांगताना कवी अजिबात हळवे न होता जीवन प्रेरणा देण्याचे कार्य करताना हसरे चेहरे, काळ हेच औषध या कवितांमधून पहायला मिळते. कवी स्वयं प्रेरणा घेऊन समस्यांवर मात करून पुढे निघतांना प्रचंड आशावादी आढळून येतात. त्यांचा हा आशावाद काव्याच्या बाबतीतही आढळतो. ‘मराठीचे शिलेदार’ समूहाचा गौरव करतांना पुढच्या वेळी काव्यप्रकाशनाचा योग येईल म्हटले आणि त्याचा हा आशावाद सत्यात उतरल्याचे आपण या काव्यसंग्रह प्रकाशनातून पाहतोय. अस्ताव्यस्त जीवनही एक दिवस नक्कीच सुरळीत व्यवस्थित होईल यावर कवीचा पूर्ण विश्वास आहे. आशेवर जगणं, स्वागत नववर्षाचे, अस्ताव्यस्त या काव्यांमधून पहायला मिळतो. कवी कल्पनेला तिलांजली देऊन वास्तव जीवन जगण्यावर भर देतांना आढळतात. कोयत्याचं जगणं, आम्ही बी..घडलो,वेगळ्या वाटा या रचनेतून, जीवनाचे भयानक वास्तव मांडतात आणि वाचकाला करूण सागरात डुंबवतांना दिसतात.

“दुसऱ्यासाठी जगा ” हा संदेश दिवाळी दान या काव्यातून आपणास वाचायला मिळतो. आजच्या गलिच्छ राजकारणावरही आपले परखड मत नोंदवतांना कवी सत्तेचा भत्ता, फक्त घोषणा या कवितांमधून सद्यस्थिती चे वास्तव मांडतांना दिसताहेत. आपल्या कवितेतून त्यांनी शिक्षणाची सद्यस्थिती, वास्तव गुंतू नकोस, हक्क आमचा, ज्ञानोत्सव, स्वागता सज्ज शाळा तसेच आधुनिक पिढीचे बेगडी रूप ‘गोधडी’ या कवितेतून कवीने मांडले आहे. गुंतू नकोस या कवितेतून मोबाईलचे दुष्परिणाम, प्रेम, वायफळ चर्चा, राजकारण यात वेळ न घालवता अभ्यासात लक्ष घालावे असाही सल्ला ते देतात. कवी शासनाची खाजगीकरणाकडे चाललेली वाटचाल समाजासाठी कशी घातक आहे हे सांगणे विसरत नाहीत –

दत्तक शाळा, खाजगीकरण, कंत्राटी कामगार,जुनी पेन्शन योजना,आरक्षण या विषयांनाही प्रखरतेने मांडताना दिसतात. कवी वास्तववादी असून कवीचा स्वकर्तृत्वावर प्रगाढ विश्वास असल्याचे दैववादी, गाभारा या काव्यांतून जाणवते. देव देव्हाऱ्यात नसून तो मनमंदिरात असतो, गरज असते ते अंतर्मनात डोकावण्याची.हे सांगत असतानाच कवी आरोग्य धनसंपदा या कवितेतून – पैशाच्या मागे न लागता स्वतः साठी स्वतः च्या आरोग्यासाठी वेळ द्यायला सांगतात. तसेच मातृत्वभाव, शब्द सामर्थ्यही मांडताना आढळतात. हंबरडा, शब्दफुले हीच त्याची उदाहरणे.

सत्यशोधक ज्योतिराव, आम्ही सावित्रीच्या लेकी,लोपला ज्ञानसूर्य, त्यागमूर्ती माता रमाई, संविधान,युद्ध नको बुद्ध हवा, कोटी प्रणाम जिजाऊ ,भीमा कोरेगाव अशा अभ्यासपूर्ण काव्यांची निर्मिती कवीकडून झाली आहे. कवी अहिंसा, सत्य या तत्वांकडे आपसूकच वळताना दिसून येतात. कारण कवीवर गौतम बुद्धांच्या विचारांचा पगडा हा प्रखरतेने जाणवतो. गौतम बुद्धांच्या विचारांनी प्रेरित होऊन जगाला शांतीचा संदेश दीक्षाभूमी, पिंपळ वृक्षा, दीप दानोत्सव या काव्यातून बौद्ध धर्माचे श्रेष्ठत्व अधोरेखित करतात.

“धम्म बुद्धाचा, मार्ग शांतीचा
प्रज्ञा, शिल ,करूणेने भरलेला,
भल्याभल्यांचे दुःख निवारण
बुद्धधम्म मार्गदर्शक ठरलेला..”

उनाड मन, लखोटा, वय नसलेलं मन, अनपेक्षित या कवितांमधून कवीने स्वच्छंदी मनाची उकल केली आहे.
तसेच कवीचे निसर्ग प्रेम हे गुलाबी थंडी, हे पिंपळवृक्षा, घरटे,पळस, सुरूवात पावसाची, महापूर, जांभूळ बेट, आस मृगाची, तिरीप, अवकाळी पाऊस,बहर नवा या कवितांमधून पहायला मिळते.निसर्गाच्या माध्यमातून कवीने जीवन शिक्षणच देण्याचा प्रयत्न केला आहे. पळस काव्यातून कवी म्हणतात –

“वेडीवाकडी वाढ याची शिकवते सारं
हसतखेळत जगा कठीण काळाम्होरं”

कविता संग्रहाच्या मुखपृष्ठावरूनच कवीची मावळतीच्या केशरी सोनेरी रंगात बहरलेली प्रीती जाणवल्यावाचून राहत नाही आणि कवीची कल्पकता कविता संग्रहाच्या नावातून पहायला मिळते. कवीने काव्याची सुरूवातच ” स्पर्शगंध मनाचा ” या कवितेपासून केली आहे. प्रेमळ हळवे असणारे प्रितीचे नाते कवीला अबोल आवडते. भावना शब्दांतून सांगण्यापेक्षा ‘समजून घेणे ‘ कवीला जास्त आवडते. स्पर्शगंध मनाचा, प्रेमकिरण, जीव माझा गुंतला, सूर तेच छेडिता,ओढ तीच अजूनही या प्रेमकाव्याबरोबरच “परतीची वाट” या कवितेतून कवीने विरहाच्या झळाही सोसलेल्या दिसून येतात.

कवी गायकवाड बी.एस. यांनी हा कविता संग्रह आपले बुद्धवासी आई व बाबा यांना अर्पण करून त्यांचे मातृ पित्रप्रेम व्यक्त केले आहे. प्रस्तावना, “सविता पाटील ठाकरे मुख्य परीक्षक, प्रशासक, लेखिका, कवयित्त्री यांची लाभली असून ज्यांच्या मनीमानसी हा काव्यसंग्रह दरवळला अशा वैशाली ताई कवयित्री, लेखिका, मुख्य परीक्षक, सहप्रशासक, संकलक यांच्या मायाळू शुभेच्छा लाभल्या आहेत. स्वाती मराडे-आटोळे यांच्या तसेच आत्तम गेंदे यांच्या मनभावन शुभेच्छा. तसेच विष्णू संकपाळ परीक्षक,कवी, यांच्या शुभेच्छा लाभल्याने काव्यसंग्रहाची श्रीमंती निश्चितच वाढली आहे. त्यात अनमोल ते काय विचारले तर या काव्यसंग्रहाचे संपादक मराठीचे शिलेदार समूहाचे सर्वेसर्वा राहुल पाटील सर, नागपूर हे आहेत.

“स्पर्शगंध मनाचा” काव्यसंग्रहात एकूण ६२ कविता असून वेगवेगळ्या विषयांचा वेध घेण्यात आला आहे आणि ‘अनपेक्षित’ या काव्याने संग्रहाचा शेवट झाला आहे. शांत, संयमी, प्रेमळ, नीती तत्वज्ञ ज्यांच्या या सर्व गुणांचा ठसा आपल्या काव्यावर उमटला आहे आणि “स्पर्शगंध मनाचा “सजला आहे. कवीच्या हातून माय मराठीची अशीच सेवा घडत राहून यापेक्षा दर्जेदार साहित्य निर्मिती होत राहो अशा शुभेच्छा. पुनश्च एकदा कवीचे खूप खूप अभिनंदन!!!

शर्मिला देशमुख -घुमरे, बीड
ज्येष्ठ कवयित्री, लेखिका
मराठीचे शिलेदार समूह
संपर्क क्रमांक:९४२१३५०८९८
७७५६९४४७०७

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles