अजूनही तिथेच मी…..!

अजूनही तिथेच मी…..!



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

आई…आई… काय लिहिणार मी? आईबद्दल परीपूर्ण लिहिणाऱ्या व्यक्तीने किंवा लेखकाने आणखी पृथ्वीतलावर जन्मच घेतला नाही,असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरणार नाही हे नक्की.त्यात मी एक पामर तो काय लिहिणार? आईचे आपल्या अपत्यावरील प्रेम आणि बाळास सर्वात जवळची असणारी आई. आई या दोन शब्दातच संपूर्ण विश्व सामावले आहे.मग ती आई माणसाची असो की प्राण्यांची. प्राण्याची ? होय तर…अगदी तुच्छ प्राण्यांची सुद्धा.तुच्छ ? म्हणजे काय? निसर्गाने तर सर्व अनमोलच बनवले पण माणसाने नाही का हजारो प्रकारात विभाजन केले..त्यातलाच एक प्रकार तुच्छ. आज अशाच एका तुच्छ प्राण्याचा आलेला ह्रदयद्रावक अनुभव. ह्रदयद्रावक? हो खूप ह्रदयद्रावक. सजीव कोणताही असो त्याला भावना असतात बरं का ! फक्त मानवालाच भावना नाहीत हं! पण या गोष्टी मानवाने समजून घेतल्या तरच ना!

साधारणपणे कोणी सहारा दिला तर तिच्याशिवाय जगू शकतील अशी तीची पिल्ले. नेहमी सोबत घेऊन फिरणारी ती आपल्या ममतेची उधळण करीत आपल्या पिल्लांचे संरक्षण करीत हिंडताना दिसायची.पण दैव… दैवच ते कोपलेले.कोणाचे काय चालणार नियतीपुढे. न जाणो कोणत्या असाध्य आजाराने तिला जखडले आणि एका झाडाच्या बुंध्याशी तिने धरणीमाय पकडली. बिचारी चिमुकली पिल्ले अवतीभवती तशीच फिरत होती दिवसभर. त्या मरणावस्थेतही आपल्या पिलांची क्षुधा तृप्ती करत पाय खोडत खोडत तिने अखेरचा श्वास घेतला आणि निरागस पिलांना कायमचे पोरके करून गेली.

आता प्रश्न पडला असेल ना कोणाबद्दल बोलतेय मी? डुक्कर.. होय एक डुक्कर माता व तिच्या गोंडस पिलांबद्दल. पिल्ले कोणाचीही असोत ती लहाणपणी गोंडसच असतात तशीच तिचीही पिल्ले. ” आई मरो पण मावशी उरो ” ही उक्ती मानवापेक्षा मला वाटते प्राण्यांनीच जपली आहे. त्या गोंडस पिलांसाठी अशीच एक मावशी उभी राहिली आणि तिने त्या पिलांचे मातृत्व स्विकारले ते पण स्वतः एक माता नसताना. तरीपण त्या भाबड्या पिलांची क्षुधा तृप्ती साठी ती मावशी त्यांना दूध पाजत होती. आता तिला दूध कसे येणार? तरीही त्या पिलांची क्षुधा तृप्ती लिलया करत होती.. काय म्हणावे? त्या मृत मातेच्या शवाजवळच ती पिलांना घेऊन बसायची. तिच्या शवाची दुर्गंधी येऊ नये म्हणून तिला तिथून हटवण्यात आले. पण त्या मातेने ज्याठिकाणी आपले प्राण सोडले ती जागा मात्र तिथेच आणि तशीच राहिली त्या पिलांची स्मृती बनून. ती मातृत्व स्विकारलेली माता आणि ती पिले यांनी आपले निवासस्थान तेच ठरवले, अगदी कायमचे.

ज्याठिकाणी तिने प्राण सोडले त्या जागेला बिलगून झोपतात ती पिले जणू आईलाच बिलगून झोपली आहेत आणि ती मावशी तिचे कर्तव्य त्यांच्या जवळ झोपून पूर्ण करते. दिवसभर फिरून विश्रांती साठी तसेच रात्री ती पिल्ले तिथेच झोपताना पाहून मनात येते त्या जागेवर फिरत असेल काय मायेचा हात? होत असेल काय क्षुधा तृप्ती? भेटत असेल काय तो उबदार स्पर्श? की मिळत असेल जीवन जगण्याची उभारी,प्रेरणा? मन सुन्न झाले… मानवा कर विचार थोडा.. असे वाटून गेले आणि ही घटना मनात घर करून राहिली जणू लेखणीतून उतरण्याचा हट्ट्च धरून. हे निशब्द प्रेम… प्राण्यांना कुठे असतात शब्द व्यक्त होण्यासाठी.. बोलता येत असते तर काय म्हणाली असती बरे ती माता अखेरीस…
!! अजूनही तिथेच मी……!!

शर्मिला देशमुख -घुमरे, बीड

Previous article
Next article

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles