जनसामान्यांना न समजलेली ‘त्यागमूर्ती’ रमाई

जनसामान्यांना न समजलेली ‘त्यागमूर्ती’ रमाई



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

‘रमाई’ तशी अनाथ पोर. बाबासाहेबांशी लग्न झाले. पण, आईने सांगितलेले ती विसरली नाही. रमाईची आई नेहमी म्हणायची, “बाई सगळ्यांना सांभाळून घे. समजुतीने वाग. माहेरचे नाव काढ.” तेव्हा रमाईचे वय तरी किती असेल? बालिकाच होती ती. पण, आईच्या मृत्युपश्चात रमाईने आईचे विचार आयुष्यभर जतन केले. सासरी आली ती सून म्हणून नव्हे, तर मुलगी म्हणून! नव्हे नव्हे, सासरी असलेल्या सर्वांची माय म्हणूनच! तिच्या गुणांनी ती कुटुंबाची प्रिय बनली. रमाईच्या सासरीही माणसांचा गोतावळा होता. गरिबी होती. पती बाबासाहेब तर शिकण्यासाठी बाहेरगावीच. त्यामुळे घरातील ज्येष्ठांची सगळी सेवा तिलाच करावी लागली. पण, रमाईने कधीही माहेरची तर सोडाच, सासरचीही निंदा केली नाही. पती दूर परदेशात, पण तिने मुलाचीही उणीव घरातल्यांना भासू दिली नाही. बाबासाहेब परदेशी असताना ती सार्‍या कुटुंबाची आधारस्तंभ बनली. बाबासाहेबांना चारित्र्यवान माणसं आवडत. रमाई ही चारित्र्याची आणि गुणांची खाणच होती.

बाबासाहेब लंडनहून शिकून येतात. त्यांचा सत्कार करायला, सगळे जमतात. रमाईचे दीर तिला पैसे देतात अणि सांगतात, “साहेब येणार आहेत. जा मुलांना आणि तुला नवीन कपडे घे.” रमाई बाजारात जाते. घरातल्या सगळ्यांसाठी कपडे घेते. स्वत:ला नवीन कपडे घ्यावेत, असे तिला वाटलेही नाही. मुलाबाळांना, घरातल्यांना नवीन कपडे पाहून आनंद वाटेल, या विचारत ती घरी आली. मग सगळ्यांनी विचारले, “रमा, तू नाही कपडे घेतलेस?” यावर रमाई फक्त हसते. पण, साहेब येणार, त्यांचे स्वागत करण्यास जायला हवे. पण, कसे जायचे? नऊवारी साडीला असंख्य ठिगळे. पण, रमाई जाते. बाबासाहेब तिला दुरून बघतात, तर रमाई दूर उभी, भरजरी साडीत. त्यांना आनंद वाटतो. पण इथे रमाईने काय केलेले असते, तर बाबासाहेबांना शाहू महराजांकडून मान म्हणून शेला आणि फेटा मिळालेला असतो. रमाई त्याची साडी बनवते आणि ती साडी नेसून जाते. रमाईसारख्या घरादारासाठी आणि इज्जतीसाठी जगणार्‍या स्त्रिया आजही घरोघरी आहेत. बाबासाहेब समाजासाठी संघर्ष करत. त्यावेळी रमाई त्यांना म्हणाली, “साहेब, तुम्ही समाजासाठी इतकं करता, मग दारूड्यांचा का बंदोबस्त करत नाही? आजूबाजूच्या आयाबायांना त्यांचे नवरे दारू पिऊन मारतात, छळतात. त्यांना कोण न्याय देणार?” रमाईने बाबासाहेबांसमोर हा प्रश्न मांडला. आपण पाहतो की, बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानामध्ये महिलांचे जीवन सुलभ बनविण्यासाठी कायदेच कायदे आहेत.

रमाईचे दु:ख रमाईच जाणे. बाबासाहेब परदेशात शिकायला असताना, रमाईचे बाळ आजारी पडते. बाळाला ती डॉक्टरांकडे नेते, पण पैसे नाहीत म्हणून डॉक्टर अक्षरक्ष: तिला हाकलतो. त्यावेळी लहानग्या बाळाला घेऊन रमाई रडत बसली. तिने बाबासाहेबांना पत्राद्वारे सांगितले नाही. का? तर बाबासाहेब तिकडे शिकायला गेलेत. त्यांना त्रास नको. पण, इथे तिच्या डोळ्यांसमोर उपचाराअभावी तिचे लाडके बाळ मृत्युमुखी पडते. पती नसताना एका आईच्या समोर तिच्या लहानग्याचा झालेला मृत्यू… त्या दु:खाबाबत शब्दच संपतात. पण, रमाई रमाई होती. तिने जिद्दीने स्वत:ला सावरले. कारण, तिला माहिती होते की, साहेबांची ती जीव की प्राण होती. तिला दु:खात बघून साहेब दु:खी झाले असते. मात्र, जेव्हा बाबासाहेबांना हे कळते, तेव्हा ते खूप रडतात. ते रमाईला म्हणतात, “रामू,(रमू) मला माफ कर. हेही दिवस जातील. दु:खच माणसाला मोठे करते.” बाबासाहेब किती योग्य म्हणाले होते. कारण, रमाईने सहन केलेल्या हालअपेष्टा, पचवलेली दु:ख यातूनच ती अवघ्या समाजाची माता झाली. माता रमाई, तुझ्या कष्टाला, तुझ्या त्यागाला वंदन…!

संपादक
marathicheshiledar6678@gmail.com
==================

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles