किल्ले कमळगड

किल्ले कमळगड



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

महाबळेश्वरच्या डोंगररांगांच्या कुशीत अनेक ऐतिहासिक गड आहेत. त्यापैकीच एक म्हणजे कमळगड. जावळी मोहिमेच्या आधी हा गड शिवरायांनी स्वराज्यात घेतला होता. धोम धरणाच्या जलाशयात मागील बाजूने एक डोंगररांग पुढे आलेली दिसते. दोन्ही अंगांनी पाण्याचा वेढा असलेल्या..एका बाजूस कृष्णा तर दुसऱ्या बाजूला वाळकी नदीचे खोरे व मधोमध दिमाखात उभा असलेला.. जणू पाण्यातून उमललेले कमलपुष्प म्हणजे हा दिमाखदार किल्ला.

कमळगडावर जाण्याचे मार्ग ट्रेकिंगचा मनमुराद आनंद देणारे आहेत. महाबळेश्वरहून केटस् पाॅइंटवरून कृष्णा नदीच्या खोऱ्यात उतरले की दीड दोन तासात नांदगणे गावी पोहचते येथून साधारण अडीच तासात आपण गडावर पोहचतो. वाई येथून नांदगणे गावी येण्यास बस आहे. तसेच वासोळे गावीदेखील बस आहे. वासोळे गावातून धोम धरणाच्या पाणवठ्याच्या दिशेने गड चढण्यास फक्त एक दीड तास लागतो.

वर जाताच गडमाथ्याच्या सपाटीवर प्रवेश होतो व आजूबाजूच्या डोंगररांगांचा सुरेख नजारा नजरेत भरतो. इतर किल्ल्याप्रमाणे प्रवेशद्वार, बुरूज असे येथे काहीच नाही. गडाला जोडून येणारी एक डोंगररांग लक्ष वेधून घेते. तिला नवरानवरीचे डोंगर असे म्हणतात. पुढे डोंगर चिरत गेलेले ४०-५० फूट लांबीचे एक भुयार दिसते. आत उतरण्यासाठी येथे पाय-यादेखील आहेत. याला गेरूची किंवा कावेरी विहीर म्हणतात. आत जाताना डोंगराच्या पोटात शिरत असल्याप्रमाणे भासते व थंडावाही वाढत जातो. तळाशी चहूबाजूने कपारी असून सर्वत्र गेरूची लाल रंगाची ओलसर माती आढळते.

गडावर दक्षिणेस कातळाची नैसर्गिक भिंत आहे. तिच्यावर बुरूजाचे थोडेफार बांधकाम दिसते. दक्षिणेकडेच गवतात काही चौथ-यांचे अवशेष आढळतात. नैऋत्येला केंजळगड, त्याच्या मागे रायरेश्वर पठार, पश्चिमेला पाचगणी, पूर्वेला धोम धरण अशी रमणीय सोबत या गडाला लाभली आहे. धोम येथील हेमाडपंथी शिवमंदिर प्रेक्षणीय आहे. येथे धोम ऋषींचे वास्तव्य होते. जवळच भोमगाव येथे प्रसिद्ध कवी वामन पंडित यांची समाधी आहे.

सौ. स्वाती मराडे-आटोळे
इंदापूर, पुणे
सहसंपादक, साप्ताहिक साहित्यगंध

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles